Thursday, April 12, 2007

कंठात दिशांचे हार

कंठात दिशांचे हार, निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ, गडे येतसे जिथून मुलतानी.

लागली दरीला ओढ कुणाची, गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब, पाउस जसा तुजभवती.

गाईंचे दुडुदुडु पाय, डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज, गुंफिते दिव्यांची माळ.

मातीस लागले वेड, अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे, अंधारकृष्ण रंगाचे.

मेघांत अडकले रंग, कुणाचा संग मिळविती पेशी ?
चढशील वाट ? रक्तात घाट, पलिकडे चंद्र अविनाशी

पळस

त्याला ठेवून एकटा
अशी उठले घाईने
शेजी वाळल्या देहाचे
त्याच्या मनात चांदणे

घर राखील तयाचे
ओवीमागचा केवडा
मग नागवी मी झाले
प्राणरतियाचा चाडा

दार वाजेल म्हणून
त्याला टाळले शब्दांत
नेत्री आणले तेवढे
गेले वाटत सांडत

लालभडक सूर्याचा
माझ्यासमोर पळस
जसे पहाटेचे पाणी
न्हाऊ घालते कळस

मरण

अलभ्य फुलला सखे घनवसंत हा मोगरा
विनम्र लपवू कुठे ह्र्दयस्पंदनाचा झरा

उन्हात मन शिंपिले पळसपेटला पारवा
कुडीत जळतो जसा मरणचंदणाचा दिवा

कुशीत जड अस्थिला नितळ पालवीची स्पृहा
भयाण मज वाटतो रुधिर अस्त गांधार हा

उदास भयस्वप्न की समिर येथला कोवळा
गळ्यात मग माझिया सहज घातला तू गळा

सुगंध दडवू कुठे गगन वैरिणीचे वरी
तुडुंब भरले तुवा कलश अमृताचे घरी

जळात जरी नागवी सलग इंद्रियांची दिठी
विभक्त जणु कुंतिला शरण कर्ण ये शेवटी

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

ती खिन्न भूपाळी

ती खिन्न भूपाळी
फिकट धूकयाचा घाट!
वर संथ निळाईत
नारिंगाची वाट!!

ती कातर काळी
तम गर्भाची नगरी!
तॆजात वितळली
स्तंभ ऊभॆ जर्तारी!!

अन सावट मंथर
कॄ्ष्ण घनाची छाया!
ऒवीत मिसळली
हंबरणारी माया!!

हा पिवळा शॆला
आज तूला अभिसारा!
घॆ गन्ध फूलांचा
जशी ऊन्हाची मथूरा !!

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

मन थेंबांचे आकाश,
लाटांनी सावरलेले
मन नक्षंत्रांचे रान,
अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त,
मन रानभूल मन चकवा

स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

मन कळोखाची गुंफा,
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात,
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सुर्य कसा झेलावा

स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

चेहरा-मोहरा याचा,
कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही,
याच्यावीन दुसरा नाही
या अनोळखी नट्याचा,
कुणी कसा भरवसा द्यावा

स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातात कसा लागावा

Monday, April 9, 2007

वार्‍याने हलते रान

वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले!
गाईचे डोळे करुण उभे की, सांज निळाईतले!!

डोळयात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी!
अंधार चुकावा म्हणून, निघे बैरागी!!

वाळूत पाय, सजतेस काय, लाटांध समुद्रकाठी!
चरणात हरवला गंध, तुझ्या की ओठी!!

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ, दिव्यांची नगरी!
वक्षात तिथीचा चांद, तुझा की वैरी!!

घर थकलेले सन्यासी

घर थकलेले सन्यासी, हळू हळू भिंतही खचते!
आईच्या डोळयामधले नक्षत्र मला आठवते!!

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते!
ढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते!!

पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी!
एकेक ओंजळी मागे, असतेच झर्‍याचे पाणी!!

मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई!
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई!!

ती गेली तेव्हा

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात मिसळली किरणे हा सुर्य सोडवीत होता

तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातुन शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मीही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा तुडवीत होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर् धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदीच्याही तो क्रिश्न नागडा होता

पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा